Monday, July 14, 2008

मागणॆ

एक All time favorate हिंदी गाणॆ ऎकतांना हे सुचले. हा प्रयत्न वेडॆपणा आहे की धाडस.

मागणॆ

आता जातांना शेवटचा हिशेब करून जा
सखे़, आपल्या प्रेमाच्या निशाण्या मिटवून जा
तुझ्या करिता लिहिल्या होत्या मी किती कविता
शाईचॆ शब्द मी परत आणले, अर्थ तुझ्याजवळच आहे
तो अर्थ बुडवून जा, प्रेमाच्या निशाण्या मिटवून जा

रानातल्या हिरव्या वाटेत बाईक सुसाट
कानात अस्पष्ट कुजबूज, माझ्या कोपर्याची लगट
रानफूलाच्या पाकळ्यात शोधत होतो तुझा स्पर्श
फुल तर सुकली मन मात्र मोहरले आहे
हा मोहोर करपून जा, प्रेमाच्या निशाण्या मिटवून जा

एक चादरीत समावण्याची दोन जीवांची धडपड
पाठीवर चांदण्यांचे प्रतिबिंब बघण्याचे माझे वेड
डोळ्यांच्या संवादात झोप बाहेर पेंगत रहायची
उशिखाली पैजण,बांगड्या अजूनही रोमांचित आहेत
सारा शृंगार घेऊन जा,प्रेमाच्या निशाण्या मिटवून जा

चिमणिच्या दातांनी चॉकलेट तोडून ओठांनी भरवणॆ
कधी लटक्या रागाने बघणे,अचानक अलगद हसणॆ
तुला आवडायची म्हणून मी फुलपाखरे पकडायचो
फुलपाखरे तर उडाली, त्यांचा रंग हाताला आहे
आठवणिंचा रंग पुसून जा, प्रेमाच्या निशाण्या मिटवून जा

आता तुला अखेरचे मागणॆ करतो
माझे श्वास स्पदंनाशी नाते तुझ्यामुळॆच जाणतो
हे नाते तोडून जा, प्रेमाच्या निशाण्या मिटवून जा

घे भरारी

घे भरारी

घे भरारी नभाला तुझी आस आहे
पाकळ्यातून फुलतील निखारे असा श्वास आहे

असतील उंच पहाड़ हे संकटांचे
स्फोटक बारुदांचा तुझ्या रक्ताला वास आहे

का काजव्यांनी कधी पेटवल्या मशाली
धग सोसती जे हात, त्यांची ती दास आहे

सुरक्षित जरी गलबते बंदरात
वादळ लाटा झेलण्याचा तयांना ध्यास आहे

“त्या” मूक प्रतिसादानॆ व्यर्थ न हो निराश
जीवनापेक्षाही का कुठले नाते खास आहे?

खबरदार श्वापद सुटली मोकाट
गाफिल जीव आवडीचा घास आहे

अक्षर गिरवण्याचे आठव बाळकडू
प्रयत्नांती अपयश, यशाचा पहिला भास आहे

चल उठ मित्रा, दे जोमाने धड़का
या भिंतीपलीकड़े तुझाच इतिहास आहे

उजाडले आहे

उजाडले आहे

उगवला नाही सूर्य, तरी उजाडले आहे
नाही वसंताची चाहूल, तरी बहरले आहे

थबकल्या क्षणांनी गोंजारलित दुःखे
उमेदीने घर पुन्हा सावरले आहे

सरसावत होते हाती घेवुनी फुंकण्या
निखारेच त्यांनी आता विझवले आहे

गुलाबी आठवाणिंना होती संचारबंदी
मन तुझ्याच सभेत आता बावरले आहे

मैफलीत होते उदास गीत गाणॆ
सूर खर्जाचे आता हरवले आहे

बुरुजावरून डागल्या त्यांनी किती तोफा
आज पांढरे निशाण तेथे फडकले आहे

ऊन पावसाशी होती हरण्याची लढाई
तरी खडकाने कोंब गर्भात जगवले आहे

प्राक्तनाच्या गोळाबेरजेत हाती उरले शून्य
नियतिलाच मी आता ललकारले आहे

Thursday, June 26, 2008

रात्र गेली !

रात्र गेली !

नाजूक श्रृंगाराला सजवून रात्र गेली
गुपित तन मनाचे उसवून रात्र गेली

घरंगळत गेली नजर घाटदार वळणातुनी
कोडॆ कंचुकिच्या बंधाचे सोडवून रात्र गेली

बिछान्याच्या व्यासपिठावर सभा तरुणाईची
ठराव उन्मादाचा सुचवून रात्र गेली

तिचे बहाणे,ओठांनी नाही डोळ्यानी हो म्हणने
डावपेच मदनक्रिडॆचे शिकवून रात्र गेली

तिच्या श्वासात श्वास माझा,ओठात ओठ
तृषार्थ गात्रांना चेतवून रात्र गेली

तनुवर टिचल्या बांगड्या,व्रण दाताचे गाली
पंचनामा घटनेचा गोंदवून रात्र गेली

प्रणयाराधना चोरून बघती चन्द्र तारे
खट्याळ साक्षिदारांना मिटवून रात्र गेली

उसने मागुन रंग तिचे, उगवली पहाट
नवजात सुर्य किरणांना प्रसवून रात्र गेली

बाबा आज तुम्ही आज हवे होताता

बाबा आज तुम्ही आज हवे होताता

बाबा तुमचेच बोट धरून मी चालायला शिकलो
तुम्हीच मला वाढवले, घड़वले
किती प्रश्न पडायचे त्या उमलत्या मनाला
तुमच्या ज्ञानकोषात मी उत्तर शोधयचो

बाबा मोठे कोण
टिळक की आगरकर, गांधी की आम्बेडकर?
अरे मोठयाचे वाद म्हणजे तार्यांची शर्यत
त्याचा निकाल आपल्याला कसा लावता येईल
सर्वांचाच आदर करावा आणि
आपल्याला जे पटेल त्याचे अनुसरण करावे

बाबा कुठले साहित्य चांगले
ग्रामीण की शहरी, दलित की ललित ?
जे प्रामाणिकपनाने लिहिले ते साहित्य चांगले
मुखवट्याचे साहित्य वाईट
साहित्याचे हे दोनच प्रकार, बाकी सर्व भेद झूट

बाबा धर्म म्हणजे काय? कुठला श्रेष्ट?
धर्मं म्हणजे श्रद्धा, माणुसकीवरील विश्वास
तुला मी मिलिंद म्हणतो, आई मनिष
आजी बाबू तर मित्र मिल्या म्हणतात
तसेच हिन्दू, इस्लाम, शिख, बौद्ध ही
त्या श्रध्दॆची वेगवेगळी नावे आहेत

बाबा शाळेत स्पर्धा आहे, भाषण लिहून दया!
पाठीवर हात ठेवून तुम्ही म्हणाला
अरे तुझी लढाई तुलाच लढावी लागेल
तू प्रा. लांजेवाराचा मुलगा आहे ही माझी ओळख आहे
पण तू असे काही कर की उद्या लोक म्हणतील
बघा मिलिंदचॆ वडील चालले आहेत

बाबा तुम्ही बोलत होतात आणि
मडके पक्के होत गेले
मग अचानक तुम्ही निघून गेलात
त्यावेळी माझा श्वासच थांबला होता
हो फार मोठा नव्हतो मी पण कळत होते
आता स्वतःलाच संघर्ष करावा लागेल
मी कितिदा रडलॊ, पडलो, ठेच लागून विरहळलो
पण तुमच्या दीपस्तंभात मार्ग शोधत गेलो
चालत रहिलो आणि आजही प्रवास संपला नाही
तुम्ही दिलेली शिदोरी अजूनही पुरते मला

आज नसेल हे आकाश माझे पण
या गर्दीत माझ्या नावाचा एक तारा आहे
असेल मंदसा पण स्वयंप्रकाशित आहे
ते बघायला तुम्ही हवे होतात
मी आहे म्हणजे तुम्हीही आहाताच,
तरीही आपल्या अंकुराचे झाड़ बनण्याच्या धडपडिचे
कौतूक करायला तुम्ही हवे होतात
बाबा आज तुम्ही खरेच हवे होतात

बेधुंद मला

बेधुंद मला !

एकदा सुर्यालाही खिशात घालायचे मला
सखे चंद्रालाही तुझ्या गळ्यात बांधयचे मला

धर्म कर्माच्या गुंत्यात का भावना अस्पृश्य
व्यासही ओशाळतील असे महाकाव्य लिहायचे मला

यौवनाचा उन्माद , इन्द्रियांची तृष्णा
चेकाळॆल कामसूत्र असे क्षण भोगायाचे मला

कुठला तो धर्मं आणि कसले प्राक्तन
देव नाकारणार्या चार्वकाच्या कुळात जन्मायचे मला

तुझ्याच आठवणिंचे ढग माझ्या आकाशात
चांदण्यांचे ताजमहल शुक्रावर बनवायचे मला

लावा धार शस्त्राना , वाजवा तुतारी
सिकंदराचे अधुरे स्वप्न पुर्ण करायचे मला

कोलाज

कोलाज
खण् खण् खण्
पैसांचा पाऊस
क्लिंग् क्लिंग् क्लिंग्
चिअर्सचा उरुस

पों पों पों
ट्रक वेगात
अs आss आ।sss
कोणी रक्ताच्या थारोळ्यात

थल् थल् थल्
उभारांच हलण
आs हाss ..आs हाss
पौरुषत्वाचे स्खलन

उ. ऊ.. ऊू...
स्मशानातिल आसव
ढिंग् ढिंग् ढिंग्
गिधाडांचे तांडव

डब् डब् डब्
गंगेची गहराई
क्टिंग् क्टिंग् क्टिंग्
स्वर्गातून उतरते आई

शू ssss ...
रात्र चढतेय
घुर्s र् घुर्s र्
मी घोरतोय